हल्लेखोरांना कल्पना नसेल अशी शिक्षा देऊ   

 

मधुबनी, (बिहार) : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्लेखोरांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना गुरूवारी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. हल्लेखोर जगाच्या पाठीवर कोठेही लपलेले असू दे, आम्ही त्यांना शोधून काढू आणि हल्लेखोरांनी कल्पनाही केली नसेल, अशी त्यांना शिक्षा देऊ, असे मोदी यांनी सांगितले.मधुबनी येथे राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.यावेळी मोदी यांनी देशवासीयांना आश्वस्त करताना आता भारत कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद सहन करणार नाही, असा इशारा दिला. संपूर्ण जगापर्यंत हा संदेश देण्यासाठी मोदींनी काही भाषण इंग्रजीत केले.
 
बिहारच्या भूमीवरुन संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याची आणि त्यांच्या पाठिराख्यांची ओळख पटवेल. त्यांना शोधून काढेल आणि शिक्षा देईल. आम्ही त्यांचा पृथ्वीच्या टोकापर्यंत पाठलाग करु. दहशतवादाला माफ केले जाणार नाही. प्रत्येक दहशतवाद्याला शिक्षा मिळेल. पहलगाममधील पीडितांना न्याय मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण देशवासीयांच्या मनात तीव्र संताप आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आमच्या पाठीशी आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
 
पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा देताना मोदी पुढे म्हणाले, हल्लेखोरांना आणि त्यांच्या पाठिराख्यांना अशी शिक्षा दिली जाईल की, त्यांनी कधी याची कल्पनादेखील केली नसेल. दहशतवाद्यांच्या आश्रयदात्यांचे कंबरडे मोडले पाहिजे, अशी १४० कोटी भारतीयांची इच्छा आहे. पहलगाममधील हल्ल्यात कोणी मुलगा, भाऊ तर कोणी पती गमावला. मृतांमध्ये कोणी बंगाली होता. तर, कोणी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा आणि बिहारचा होता. कारगिल ते कन्याकुमारीपर्यंत सर्वांचे दुःख आणि राग सारखाच आहे. जलद विकासासाठी शांतता आणि सुरक्षा महत्त्वाची आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
 

Related Articles